पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याची इत्थंभूत माहिती आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार यांनाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी जिल्ह्यातील दहा तालुकाध्यक्षांनी केली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात गारटकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीनंतर गारटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गारटकर यांनी सांगितले की, याबैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सहकारी संस्था, कारखाने, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, कात्रज दूध संघांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रश्न आगामी काळात कसे सोडविता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. जयंत पाटील यांनी मला जिल्हाध्यक्ष पदावरुन हटविल्यानंतर सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी मला पुन्हा या पदावर नियुक्त करून काम करण्याची संधी दिल्याचेही गारटकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात बुथ सर्व्हेक्षण अभियान राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या समर्थनार्थ पाठींबा व्यक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तातडीने भरुन देण्याविषयी निर्णय झाला असल्याचे गारटकर यांनी सांगितले.
तीन तालुके “साहेबां’च्या बाजूने
जिल्ह्यात पहिल्यांदाच अजित पवार गटाची बैठक गारटकर यांनी बोलविली होती. याबैठकीस जिल्ह्यातील 13 तालुक्यातील तालुकाध्यक्षांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी 10 तालुकाध्यक्ष यांनी या बैठकीस उपस्थिती लावत अजित”दादा’ पवार गटास समर्थन दिले. तर दौंड, पुरंदर आणि मुळशी हे तीन तालुकाध्यक्ष बैठकीस हजर राहिले नाहीत. यावरून या तीन तालुकाध्यक्षांनी शरद पवार “साहेबां’कडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.