खडकवासला – थर्टी फर्स्ट निमित्ताने हवेली आणि वेल्हे तालुक्यातील फार्महाऊसवर होण्याऱ्या डर्टी पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. थर्टी फर्स्टनिमित्त खडकवासला येथील पर्यटक, व्यावसायिक जय्यत तयारी करीत आहेत. खडकवासला, पानशेत, सिंहगड परिसरात ठीकठिकाणी पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पुढील काही दिवसांत या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, पार्ट्यांचे आयोजक, पर्यटक, वाहतूक व्यावसायिक, स्थानिक पोलीस पाटील यांची जबाबदारी वाढणार आहे. आयोजित होणाऱ्या पार्ट्यांची माहिती, त्यांच्या आयोजकांची माहिती, किती व्यक्ती उपस्थित राहणार यांची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे.
खडकवासला, पानशेत, सिंहगड परिसरातील आडमार्गाला असलेले फार्महाऊस बदनाम होत आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक पार्ट्यांवर कारवाया झालेल्या आहेत; तरीही डर्टी पार्ट्या बंद होत नाही. त्यातच 31 डिसेंबर अवघ्या काही दिवसांवर आल्याने पुन्हा या पार्ट्यांना ऊत येणार असल्याची शक्यता आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हवेली ग्रामीण हद्दीत सर्व फार्महाऊस, हॉटेल, पर्यटकांवर पोलीस प्रशासनाची नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळुन आल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पोलीस प्रशासनास
सहकार्य करावे.
– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली ग्रामीण
वेल्हे, पानशेत परिसरात पर्यटकांची संख्या 31 डिसेंबरनिनित्त वाढते त्यामुळे या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, फार्महाऊस यांना सूचना देण्यात येणार आहे.
– मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, वेल्हे