खडकवासला, -कातरखडकातील अती बिकट डोणगिरी (तानाजी कडा) कड्यावरून विक्रमी 22 मिनिटांत सिंहगड किल्ल्यावर चढाई करून मावळा जवान संघटना व एस एल ऍडव्हेंचरच्या मावळ्यांनी हर हर महादेव, जय शिवरायच्या जयघोषात नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली.
काळोख्या रात्री मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात दोरखंडाच्या साह्याने पाचशे फूट उंचीचा अतिबिकट कडा सर करून गडाच्या माथ्यावर पोहोचताच मावळ्यांनी माथा टेकवला. नरवीर तानाजी मालुसरे की जयचा जयघोष केला. अंगावर शहारे आणणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाने सिंहगडावर शिवकाळ जागा झाला.
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन जगातील पहिल्या स्वातंत्र्याचा लढा अजरामर करणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या (तिथीनुसार) 353 व्या बलिदानदिनानिमित्त स्थानिक मावळा जवान संघटना व एस एल ऍडव्हेंचरच्या वतीने नरवीरांना मानवंदना देण्यासाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आधी केवळ निवडक गिर्यारोहकांनीच या कड्यावरून यशस्वी चढाई केली आहे. प्रथमच एकाच वेळी सिंहगड, पुणे भागातील गिर्यारोहक लव्हू उघडे, तुषार दिघे, कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण, शैलेश थोरवे, प्रसाद बागवे, मंगेश सांबरे, विनोद गायकवाड व युवराज घटकळ हे नऊ मावळे मध्यरात्री गडाच्या पश्चिमेच्या कड्याखाली दाखल झाले.
रात्री साडेबारा वाजता डोणगिरी कड्याच्या चढाईला सुरुवात केली. लव्हू उघडे व तुषार दिघे यांच्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जण दोरखंडाच्या सरसर चढाई करत अवघ्या बावीस मिनिटांत गडावर पोहोचले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विक्रमी वेळेत कडा सर करून गडावर यशस्वी चढाई करणाऱ्या गिर्यारोहक लव्हू उघडे व इतर मावळ्यांचा इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे जीवनचरित्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
नरवीरांना पारंपरिक रिवाजात अभिवादन
जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती, घेरा सिंहगड ग्रामपंचायत, नरवीर तानाजी मालुसरे संस्था, सिंहगड व्यावसायिक संघटना, तसेच विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांना आज अभिवादन करण्यात आले. आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे, हवेली पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागणे, ग्रामसेवक खाडे, सरपंच पढेर, अमोल पढेर, बाळासाहेब नवले, गंगाधर भडावळे, विश्वनाथ मुजुमले सहभागी झाले होते.