किल्ले शिवनेरीवर तीन दिवस हिंदवी स्वराज्य महोत्सव

पुणे -महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाची शिवजयंती साजरी होणार आहे. किल्ले शिवनेरीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीन दिवस (दि. 18 ते 20) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या विद्यमाने हा महोत्सव पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे. जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. प्रथमच “महाशिव आरती’ चे आयोजनासह विविध कार्यक्रम होणार आहे.
हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन 18 फेब्रुवारीला साडेसहा वाजता होईल. त्यानंतर पुढील तीन दिवस दिग्दर्शक अशोक हांडे यांचा “मराठी बाणा’ कार्यक्रम, किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, शिववंदना, महाआरती कार्यक्रम, जाणता राजा महानाट्य होईल. यावेळी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन असेल.




