लोणी देवकर -येथील ग्रामदैवत वेताळबाबा यात्रेनिमित्त मंगळवारी (दि. 14) ग्रामस्थांनी जंगी कुस्त्यांचे आयोजन केले होते. अंतिम लढत हरियाणाचा मल्ल प्रवीण भोला विरुद्ध महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सिकंदर शेख यांच्यात झाली. यामध्ये प्रवीण भोलाने आपल्या कौशल्याने सिकंदरला कमालीची झुंज दिली. यामध्ये अखेर सिकंदर शेखने भोलाला आस्मान दाखवत उपस्थितांची मने जिंकून वेताळबाब केसरीचा किताब पटकाविला.
वेताळबाबा कुस्ती आखाड्याला दुपारी तीन वाजता सुरुवात होऊन रात्री नऊपर्यंत जवळपास 220 मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेतला होता. मल्लांना साडेसात लाख रुपये इनाम ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. कुस्तीशौकिनांसाठी आयोजकांनी मोठा शामियाना उभारला होता. जवळपास 4 ते 5 हजार लोकांची आसनांची व्यवस्था करण्यात आली होती. या आखाड्याला नामांकित मल्ल छोटा रावसाहेब मगर, शिवाजी राव पाचपुते, मल्लसम्राट अस्लम काझी आणि बापू लोखंडे उपस्थित होते. कुस्ती आखाड्याचे समालोचन इंदापूरचे सुभाष दिवसे, युवराज केचे आणि प्रशांत भागवत यांनी केले.
कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीशौकिनांनी तुफान गर्दी केली होती. कुस्त्यांचे आयोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीतर्फे उद्योजक सचिन डोंगरे, ऍड. अवधूत डोंगरे, माजी सरपंच अमोल तोरवे, विजय डोंगरे, अनिल तोंडे-पाटील, सागर तोंडे, अर्पण डोंगरे, महेश डोंगरे, अमित तोंडे, सिद्धेश्वर थोरात, सुरेश थोरात, अजिंक्य घाडगे, लक्ष्मण देवकर, महेश घाडगे, कैलास राखुंडे, भारत देवजर आणि अजय डोंगरे यांनी केले होते.
सुवर्णकन्या वैष्णवी, घाडगे यांचा सन्मान
नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या राष्ट्रीय कुस्तीमध्ये लोणी देवकरची कन्या वैष्णवी तोरवे हिने सुवर्णपदक जिंकल्यामुळे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. भाऊ घाडगे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सदर यात्रेसाठी आणि कुस्तीसाठी मोठा शामियाना, मंडप आणि विद्युत रोषणाई अगदी विनामूल्य देऊ केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मानाचा फेटा अमोल तोरवे यांना
रावसाहेब मगर यांचा परंपरेनुसार सन 1997 पासूनचा असणारा मानाचा 3686वा फेटा लोणीचे माजी सरपंच अमोल तोरवे यांना बांधण्यात आला. त्यांचे कुस्ती क्षेत्रातील योगदान तसेच ते नव्याने बांधत असलेल्या महिला कुस्ती संकुल यामुळे त्यांना मानाचा फेटा बांधत असल्याचे आयोजकांनी सांगितले.