ओझर -अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्ताने पहाटे चार वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त राजश्री कवडे यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले. दिवसभरामध्ये पहाटे चार ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख 50 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
मंदिरामध्ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी डॉ. कैलास बावसकर, विजय जाधव, दिपक लोंढे, गणेश टाव्हरे, बाळासाहेब शहाणे यांची उपस्थिती होती. आज डिसेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी व रविवारच्या योगाने पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी साडेसात वाजता महाआरती व दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले.
सकाळी साडेदहा वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली. दरम्यान, कुकडी नदीतीरावर प्रथेप्रमाणे गंगाआरती पार पडली. याचवेळी मंदिरात नियमित हरिपाठ व धुपारती करण्यात आली. चंद्रोदयापर्यंत अर्चना नेवकर यांचे हरिकीर्तन झाले, त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली.
गणेश कदम, भरत सुनंदा, पशुसंवर्धन अधिकारी धनंजय परकाळे, डॉ. कैलास बाविस्कर यांनी देवस्थान ट्रस्टच्या मोफत दवाखान्यास भेट देऊन त्याठिकाणी शासकीय ओपीडी सुरू करण्याचे जाहीर केले.