उरुळी कांचन-अहमदनगरहून उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुमारे 24 लाखांच्या दोन किलो चरसची विक्री करणासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थविरोधी पथक क्र. 2 ने शुक्रवारी (दि. 3) अटक केली आहे. औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय 27, रा. दर्गा दर्या रोड, मुकुंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असताना,
पथकातील पोलीस अंमलदार योगेश मांढरे, युवराज कांबळे यांना सराईत गुन्हेगार औरंगजेब उर्फ रंगा हा उरुळी कांचन येथे चरस विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पांढरस्थळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. आरोपी अन्सारी हा रस्त्यावर सॅक घेऊन उभा असलेला दिसला.
पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले. याच्याकडे बॅगमध्ये 24 लाख रुपये किमतीचे दोन किलो चरस, मोबाइल असा एकूण सुमारे 24 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अन्सारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वर्षापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.