कोरेगाव -रयत शिक्षण संस्था उभी करण्यात योगदान देणाऱ्या डी. पी. भोसले यांची ओळख “खोकेवाले भोसले’ अशी होती; परंतु ती आताच्या “खोकेवाल्यां’सारखी नव्हती, अशी कोपरखळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाव न घेता रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली.
येथील डी. पी. भोसले महाविद्यालयातील नूतन मुख्य इमारत, सायन्स विभागाची इमारत आणि डॉ. पतंगराव कदम सभागृह नामकरण कार्यक्रमात ते बोलत होते. कोरेगावातील डी. पी. भोसले महाविद्यालय आणि रयतची इतर महाविद्यालये उभारण्यासाठी नागझरी, ता. कोरेगाव येथील धोंडोजी पाटलोजी भोसले यांनी मोठे सहकार्य केले होते. त्यांची मुंबईमध्ये लाकडाची वखार होती. वखारीत ते वेगवेगळ्या आकारांची लाकडी खोकी बनवून, भारतीय लष्कराला दारूगोळा, कपडे ठेवण्यासाठी पुरवत होते.
त्यामुळे “खोकेवाले भोसले’ अशी त्यांची ओळख झाली होती. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत कर्मवीरअण्णांना मोलाचा आर्थिक हातभार धोंडोजी भोसले यांनी दिला होता, याचा दाखला देत शरद पवार म्हणाले, कोरेगावच्या या महाविद्यालयात कोणी आले, तर ते “खोकेवाले भोसले कोण, असे विचारत असत; पण ते खोकेवाले वेगळे होते आताच्या “खोकेवाल्यां’सारखे नव्हते. ते लोकांसमोर पैशांचे खोके ठेवत असत आणि तुम्हाला काय हवे तेवढे घ्या, असे म्हणत असत. तो विषय वेगळा होता आणि आताचा विषय वेगळा आहे. त्या विषयावर मी जास्त बोलणार नाही. ही ती जागा नाही. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मारलेल्या जोरदार कोपरखळीने उपस्थितांमध्ये हशा पिकला. कॉलेजच्या कार्यक्रमात पवारांनी केलेल्या राजकीय वक्तव्याचे पडसाद उमटले.