अवसरी – अवसरी खुर्द, बुद्रूक, गावडेवाडी, तसेच टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) परिसरातील घरगुती वीज ग्राहकांना विजेची जादा बिले येत आहेत. घरगुती वीज ग्राहकांना जादा बिले देऊन ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे. योग्य, अचूक बिल न दिल्यास, तसेच नादुरुस्त मीटर लवकरात लवकर बदलून न दिल्यास मंचर येथील महावितरणच्या कार्यालयावर आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांतर्गत अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, टावरेवाडी ही चार गावे येतात. येथे चार हजार घरगुती ग्राहक आणि कृषी पंपाचे पंधराशे ग्राहक आहे.
ग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यासाठी महावितरण कंपनीने मीटरचे फोटो रीडिंग घेण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. मात्र, तरीही वीज ग्राहकांना फोटो रीडिंग उपलब्ध नाही. मीटर नादुरुस्त असल्याचे कारण सांगून भरमसाठ अंदाजे बिले दिली जात आहेत, त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.