विश्रांतवाडी – नगर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तो रामवाडीपर्यंत आणला जाईल. तर, शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत हा मार्ग सिग्नल फ्री करण्याची मागणी केली होती. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलीस सहआयुक्त संखे उपस्थित होते.
दरम्यान, या उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करावा, अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या. तर, शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसंबंधी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे आदेश पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले. धानोरी, संतनगर, फाइव्ह नाइन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी. त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.
मेट्रो मार्गिका विमानतळापर्यंत
नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा, असे आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.