पुणे (गणेश आंग्रे) गणेश आंग्रे – शिवाजीनगर आणि कोथरूड या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा भाग या प्रभागात येतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा 60 टक्के तर शिवाजीनगर मतदारसंघाचा 40 टक्के परिसर मिळून हा संपूर्ण प्रभाग तयार झाला. वस्त्या व सोसायट्या असणारा आणि संमिश्र लोकवस्ती असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाचे एक हाती प्राबल्य या प्रभागात असेल, असे मानण्यासारखी सध्याची परिस्थिती राहिलेली नाही. मागील निवडणुकीमध्ये या प्रभागात चारही उमेदवार भाजपचे निवडून आले. तर, दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेना व मनसे या पक्षाच्या उमेदवारांना मिळाली.
प्रभागातील समाविष्ट भाग
फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणे, डेक्कन जिमखाना, वकीलनगर, मेजर ताथवडे उद्यान, अलंकार सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, करिष्मा सोसायटी, शामराव कलमाडी हायस्कूल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एसएनडीटी कॉलेज, एफटीआय, आयएलएस लॉ कॉलेज, बालभारती, हनुमान टेकडी, पांडवनगर, तुकराम पादुका चौक, घोले रोड, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी उद्यान, पुलाची वाडी, गरवारे कॉलेज, खिलारेवाडी, कमला नेहरू पार्क, बीएमसीसी कॉलेज, पीवायसी हिंदू जिमखाना, शांतीलीला सोसायटी, भारतकुंज, श्रीधर कॉलनी.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
नागरिकांसाठी अत्याधुनिक जिम, समाजमंदिरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा उभारण्यात आले. आयुष्मान भारत योजनेची सुमारे अडीच हजार नागरिकांना कार्डचे वाटप, पालिकेच्या माध्यमातून एक हजार रेमडेसिव्हरची इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली. करोना शिधावाटप करण्यात आले.दिपक पोटे (भाजप)
एसएनटीडीजवळील सुमारे पाच लाख लिटर पाण्याची गळती रोखली. कर्वे रस्त्यावरील 50 वर्षे जुनी ड्रेनेजची लाइन बदलली. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणून बालकांचा विकास, उद्योजकता आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी यांवर पुस्तके प्रकाशित करण्यात आली.माधुरी सहस्रबुध्दे (भाजप)
प्रभागातील रस्ते, पदपथ, ड्रेनेज व्यवस्था आणि कचरा या समस्या सोडविल्या. अंतर्नाद योग केंद्र, निसर्गायन बाल वाचनालय, दिव्यांग आधार केंद्र, आधार सुविधा केंद्र, हिरकणी कक्ष असे प्रकल्प राबविले. जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिम महिन्याच्या शेवटच्या शनिवारी राबविण्यात येते.मंजुश्री खर्डेकर (भाजप)
प्रभागात दुर्मिळ झाडे आहेत. तेथे पाट्या लावून त्यावर त्या झाडांची माहिती लिहिली जात आहे. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यास प्राधान्य दिले. तसेच, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 तास उपलब्ध राहिलो. जयंत भावे
(भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
मेट्रो सुरू करण्यास विलंब केला आहे. कामे अर्धवट असताना उद्घाटनाची घाई केली जात आहे. फूटपाथ चांगले असताना सुद्धा ते उकरून पुन्हा फूटपाथ करण्याचा घाट घातला जात आहे. प्रभात रोड परिसरातील काही भागात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.प्रशांत वेलणकर (कॉंग्रेस)
या प्रभागात मागील अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असूनही कोणतेही मोठे काम अथवा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या आजही कायम आहे. केवळ दिखाऊपणा केला जात आहे. नदीकाठच्या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही.डॉ. प्रांजली थरकुडे (शिवसेना)
प्रभागात समान पाणी वाटप होताना दिसत नाही. काही भागात अपुरा व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. नदीकाठचा रस्त्याचा प्रश्न अजूनही सोडविलेला नाही. चांगले फूटपाथ तोडून नव्याने फूटपाथ केले गेले. यामध्ये नागरिकांच्याच पैशांची उधळपट्टी होते.प्रभावती बोरकर (अपक्ष)
केवळ पदपथांना लाली-पावडर करण्यात पाच वर्षे गेली. नागरिकांच्या आशेचा हिरमोड केला. नाल्याची मोठी दुरवस्था झाली आहे. शहराच्या हिताचा कोणताही प्रकल्प आलेला नाही. कचऱ्यांचा एकही प्रकल्प नाही. महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत मिळेल, असे एकही काम केले नाही.मंदार बलकवडे (मनसे)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, दिपक पोटे, माधुरी सहस्रबुध्दे, निलिमा खाडे, अपूर्व खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, सुनील पांडे लोहगावकर, हर्षदा फरांदे, अमोल डांगे. राष्ट्रवादी कॉंग्रेस : प्रा. मुक्ता थरकुडे, सुकेश पासलकर, महेश हांडे. शिवसेना : गजानन थरकुडे, राजेश पळसकर, अनिल माझिरे, अतुल दिघे, विलास सोनवणे, वैष्णवी सोनवणे, रामभाऊ बांटुंगे. कॉंग्रेस : संदीप मोकाटे, अंजनेय साठे, अजित ढोकळे, सोनाली जाधव, राजू साठे, प्रशांत वेलणकर, अण्णा गोसावी. मनसे : राम बोरकर, मंदार बलकवडे, अनिल राणे, उदय गडकरी, गणेश शेडगे, प्रभावती बोरकर, सुरेखा होले.