पंजाबमधील सत्तेचा पुण्यात विजयोत्सव
पुणे – दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळविल्याने आपच्या पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला. पंजाब विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी शहरात विजयोत्सव साजरा केला. आता, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपचे कार्यकर्ते महापालिकेत सक्रिय झाले असून त्यांच्याकडून महापालिकेतील वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. तसेच, सर्वासामान्यांच्या प्रश्नांवरही आंदोलने केली जात आहे. त्याचत आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळाली, गोव्यातही चांगली कामगिरी केली आहे. पक्षाने केलेल्या या कामगिरीमुळे पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, भारतीय राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस आहे. प्रस्थापित रथी महारथींना त्यांच्याच आखाड्यात धूळ चारत, भारतीय राजकारणाला नवीन वळण देणारा असा हा आम आदमीचा मोठा विजय आहे. सामान्य जनतेच्या आकांक्षांना प्रतिसाद देत “आम आदमी पार्टी’ महाराष्ट्रातही नवा अध्याय सुरू करू पाहते आहे. त्याला पंजाबच्या या निकालांनी मोठे पाठबळ मिळाले आहे. आगामी काळात पुणे शहरासह अन्यत्रही आप सर्वत्र दिसू शकेल.