पुणे – कार्यालयीन कामकाजाची तपासणी अथवा निरीक्षणासाठी अधिकारी कार्यालयांना भेटी देतात. या तपासणीत कोणत्याही भेट वस्तू स्वीकारता येणार नाहीत. तपासणीच्या नावाखाली पर्यटन स्थळांना भेटी देणे व अन्य खाजगी कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसाठी फतवाच काढला आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक दिशादर्शिका निश्चित करुन देण्यात आलेली आहे. या अंतर्गत कार्यालयांची तपासणी, शाळांना भेटी देणे, बैठका घेणे, दप्तर तपासणी यासह अन्य दौऱ्यांचा समावेश करुन देण्यात आलेला आहे. कार्यालयांची निरीक्षणे नोंदविताना त्यात कोणत्याही गैरप्रकारास वाव मिळू नये यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांसाठी नियमावलीस ठरवून देण्यात आलेली आहे. शासकीय दौरा करताना शासकीय वाहनाचा अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच उपयोग करावा लागणार आहे.
निरीक्षण टिप्पणी तात्काळ त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी वरिष्ठ कार्यालयात ऑनलाइन अथवा ऑफलाइन सादर करण्याची दक्षता घेतलीच पाहिजे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे. आदेशाचे तंतोतंत पालन करावेच लागणार असून त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना शिक्षण आयुक्तांनी हे आदेश बजावले आहेत.
अधिकाऱ्यांना सक्त आदेश
दौऱ्यासाठी खासगी वाहनांचा वापर करू नये. कोणत्याही स्वरूपाच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत.
शक्यतो शासकीय विश्रामगृहातच मुक्काम करावा
कोणत्याही खासगी स्रोतांमधील सेवा वापरू नयेत. शासकीय दौऱ्याला समारंभासारखे स्वरूप नसावे