माघ पौर्णिमा उत्सवानिमित्त जेजुरीत भाविकांची उसळली गर्दी
जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या माघ पौर्णिमा उत्सवानिमित्त देवदर्शन कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची जेजुरीत मोठी गर्दी उसळली असून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने गड दुमदुमला होता.
विशेषतः रायगड, रेवदांडा, मुंबई, ठाणे, कुलाबा येथून मोठ्या प्रमाणावर कोकणी (कोळी) बांधव कुटुंब कबिल्यासह आपल्या देवघरातील टाक व देवांच्या पालख्या घेऊन गेली दोन दिवसांपासून जेजुरीत दाखल झाला आहे. अंदाजे 20पालख्यांसह कोळी बांधवांचा मुक्काम चिंचेची बाग परिसरामध्ये आहे. तर नाशिक, संगमनेर, संभाजीनगर, आळेफाटा, नारायणगाव, सातारा येथून सुमारे 40 प्रासादिक शिखरकाठ्या जेजुरीत दाखल झाल्या आहेत.
शुक्रवारी (दि.23) सायंकाळपासून कोळीबांधव आपल्या पालख्या भंडारा उधळणीत पारंपरिक वाद्यांच्या तालात नृत्य करीत गडावर दाखल होत देवभेट सोहळा पार पाडत होते. तर हलगीच्या तालावर सनईच्या सुरात उत्तर महाराष्ट्रातील भाविक शिखरकाठ्यांसह गडावर दाखल होत कळसाला काठी टेकवत देवदर्शन घेत होते.
रंगीबेरंगी रेशमी कापड, मोराचे पिस त्यावर झुपकेदार गोंडे अशा सजविलेल्या शिखर काठ्या तर कोळी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करीत फुलांमाळांनी सजविलेल्या देवांच्या पालख्या, साथीला पारंपरिक वाद्य आणि पिवळ्या जर्द भंडार्याची मुक्त उधळण असे विलोभनीय दृश्य जेजुरीत दिसून येत असल्याने बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन घडत होते. दोन दिवसांमध्ये सुमारे दीड लाखांहून अधिक भाविकांनी गडावर दाखल होत देवदर्शन घेतले. भाविकांचा मुक्काम चिंचेची बाग व कडेपठार मार्गावर असल्याने खेळणी, मिठाई, उपहारगृहे, प्रसादपुडे, भंडारा खोबरे यांची दुकाने सजली आहेत.
आज शिखरकाठी उत्सव
माघ पौर्णिमा (रविवारी दि.25) हा खंडेरायाचा शिखरकाठी उत्सव समजला जातो यामध्ये संगमनेरकर होलम राजा, सुपे (बारामती) येथील खैरे पाटलांची शिखरकाठी व स्थानिक जेजुरीकरांची महाराजा होळकर यांची शिखरकाठी यांना विशेष मान आहे. या तिन्ही शिखरकाठ्यांसह त्यांच्यासोबत असलेल्या प्रासादिक शिखरकाठ्या पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार रविवारी गडावर दाखल होत आपला मान घेणार आहेत.