निरगुडसर (ता. आंबेगाव) :येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
पुणे जिल्ह्यातील 184 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मैदान चांगलेच तापले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. यावेळी बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत.
नारायणगावमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बारामती तालुक्यात दोन गटांत वाद झाले. किरकोळ अपवाद वगळता शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. गावकारभारी पद मिळविण्यासाठी प्रस्थापित नेत्यांची कसोटी लागली आहे. सोमवार (दि. 6) रोजी प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया रविवारी (दि. 5) पार पडली. सोमवारी (दि. 6) घोडेगाव तहसील कार्यालय येथे मतमोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर होणार आहे; मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शनिवार रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाले असून आता लक्ष्मी कोणाला प्रसन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या तोंडावर मतदारांवर पैशांची उधळण झाल्याने मतदारांची दिवाळी गोड होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यापैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 21 ग्रामपंचायतीचे रविवारी मतदान झाले. निवडणुका असलेल्या गावांमध्ये सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदानासाठी आलेल्या मतदारांना उमेदवारांनी खाण्यापिण्यासह, पैशांची व्यवस्था केली होती.
बाहेरगावावरून येणाऱ्या मतदारांना हॉटेल धाब्यावर जेवणासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदानाच्या दोन-तीन दिवस अगोदर मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याची चर्चा असून सर्वच उमेदवारांनी मतदारांची दिवाळी गोड केली आहे. एका मताला एक हजार ते पाच हजारपर्यंत रुपये वाटप केले असल्याचे सांगितले जात आहे.
तर अनेक ठिकाणी चिन्ह असलेल्या वस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सर्वच उमेदवारांनी निवडून येण्यासाठी आपली ताकद लावली असून दिवाळीच्या तोंडावर मतदारांवर पैशांची उधळण झाल्याने मतदारांची दिवाळी गोड झाली आहे.
केळगावातील दोन जागांसाठी 94 टक्के मतदान
चिंबळी -केळगाव (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या दोन जागेसाठी घेण्यात आलेल्या वॉर्ड एकच्या पोटनिवडणुकीत सर्व साधारण जागेसाठी तीन महिला व दोन पुरुष उभे आहेत. यामध्ये 363 पैकी 172 पुरुष व 171 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदान 343 (94 टक्के) झाले असल्याचे केंद्र प्रमुख लक्ष्मण मिमिडगुले व तलाठी बी. आर. पाटील यांनी सांगितले. निवडणुक निर्णय अधिकारी स्मिता जोशी, पोलीस पाटील युवराज वहिले, माजी उपसरपंच अमोल विरकर आदी उपस्थित होते.
मर्यादेपेक्षाही अधिक पटीने खर्च
निवडणुकीसाठी उभे राहिलेला उमेदवारास खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिलेली असते; मात्र उमेदवाराकडून मर्यादेपेक्षा अधिक पटीने खर्च केला गेला आहे. सोमवारी (दि. 6) घोडेगाव तहसील कार्यालय येथे सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वाटलेली लक्ष्मी कुणाला प्रसन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दगडावर पाय ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाही…
निवडणूक म्हटले की मतदारांना पैशाची वाटप होते. याची जाणीव असल्याने अनेक मतदारांनी रात्रीच्या वेळी आपल्या दरवाजाच्या कड्या लावल्या नव्हत्या, जेणे करुन कार्यकर्ते येथील व तात्काळ पैसे देऊन मागे फिरतील असे नियोजन केले होते. तर अनेकांनी घरासमोरील पाळलेले कुत्रे दुसऱ्या ठिकाणी बांधून ठेवले होते जेणेकरून पैसे वाटप करण्यास कार्यकर्ते आल्यास कुत्रे भूकणार नाही व आजूबाजूला कळणार नाही तसेच पैसे घेऊन आलेले कार्यकर्ते घाबरणार नाही व आपल्याला पैसे तात्काळ मिळतील याची सोय केली होती. दिवाळी जवळ आल्याने दोन दगडावर पाय ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पैसे वाटप झाल्याचे सांगितले जात आहे.