Iran Air strike in Pakistan : इराणकडून बलुचिस्तानमधील पाकिस्तानतील पंजगुरमध्ये हवाई हल्ला केला आहे. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या या दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या सीमा भागांत इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. पाकिस्तानमधील जैश अल-अदलने इराणच्या दोन ठिकाणांवर हल्ले केले होते.
कुहे सब्ज भागात जैश उल-अदलचे तळ हे दहशतवादी गटाच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहेत. या तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यावरून पाकिस्तानने बुधवारी पहाटे निवेदन जारी केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
जैश अल-अदल गटानं इराणच्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने हल्ला केल्याची माहिती जैश अल-अदल गटाकडून देण्यात आली आहे. इराणने बलुचिस्तानच्या पर्वतीय भागांत जैश अल-अदल संघटनेच्या अनेक अतिरेक्यांच्या घरांना लक्ष्य केले आहे.
किमान सहा ड्रोन आणि अनेक क्षेपणास्त्रांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश अल-अदलच्या सैनिकांची दोन घरं उद्ध्वस्त झाली. त्याचे कुटुंबीय जखमी झाले. या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. जैश उल-अदल या दहशतवादी गटाने यापूर्वी पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात इराणी सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.