दोन मेंढ्यांचा मृत्यू;दोन जनावरे जखमी
पारगाव शिंगवे – मेंढपाळच्या कळपावर दोन बिबट्यांनी हल्ला करून उसाच्या शेतात दोन मेंढ्यांचा फडशा पाडला. दुसऱ्या घटनेत शेळीपालक महिलेच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळी जखमी केली, तिसऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ली करून त्यास जखमी केले. या सर्व घटना भराडी (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. 15) रात्री घडल्या.
भराडी-जवळे रस्त्याच्या बाजूला गेणभाऊ खिलारी यांच्या शेत जमिनीत मेंढपाळ दामू सदा टकले (ता. पारनेर) यांनी मेंढ्यांचा कळप बसवला होता. दोन बिबट्यांनी रात्री दोनच्या सुमारास उसाच्या शेतातून येऊन मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यावेळी कळपाजवळ असलेल्या कुत्र्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
मेंढपाळानेही बिबट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु या दोन बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपातील दोन मेंढ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. एका महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत में ढपाळ दामू टकले यांच्या 7 मेंढ्या ठार झाल्या असून, 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुसऱ्या घटनेत भराडी गावठाणातील सारिका साहेबराव सरोदे यांच्या गोठ्यातील लोखंडी जाळीवरून उडी मारून एका शेळीवर हल्ला करून जखमी केले. गाईच्या शेजारी ही हल्ला झालेली शेळी बांधलेली असल्याने बिबट्याला शेळी घेऊन जाता आली नाही. तिसऱ्या घटनेत गावडे मळा येथे लक्ष्मण जांभळे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले.
या घटनांची माहिती पोलीस पाटील संतोष खिलारी व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ गावडे यांनी वन विभागाला दिली. भराडी परिसरात महिनाभरापासून मेंढ्यांवर, पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी वारंवार करूनही वनविभागाने अद्याप पिजरे लावलेले नाहीत.