शिक्रापूर -येथील चाकण चौकामध्ये गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना गावठी पिस्तूलसह जेरबंद केले असल्याची माहिती शिक्रापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.
नितीन सुधाकर जाधव (वय 25 रा. भांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर), किरण भरत कोळी (रा. रांजणगाव, ता. शिरूर, मूळ रा. गोरघावले, पोस्ट खेडीभोकरी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस शिपाई मिलिंद दिलीप देवरे (रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौकामध्ये दोन युवक गावठी पिस्तून विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई मिलिंद देवरे यांना मिळाली.
त्यांनतर निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, पोलीस शिपाई मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, लक्ष्मण शिरसकर यांनी चाकण चौकामध्ये साध्या वेशात सापळा लावला असताना त्यांना चाकण चौकातील एका कपड्याच्या दुकानासमोर दोन युवक संशयितपणे आलेले दिसले.
त्यावेळी पोलिसांनी युवकांना हटकले आणि ताब्यात घेतले असताना त्यातील एका युवकाच्या कमरेला गावठी पिस्तूल मिळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेत जेरबंद केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.