सासवडमध्ये तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन
मराठा कुणबी दाखल्यांसाठी प्रशासन “अलर्ट’
सासवड – शासनाकडील सूचनांच्या अनुषंगाने मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी पुरंदर यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन केली आहे.
तालुक्यातील 103 गावांचे 7/12 चे जुने अभिलेख तपासण्यात येत आहेत, अशी माहिती पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
समितीची उपविभागीय अधिकारी पुरंदर उपविभाग, पुरंदर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यामध्ये जुने अभिलेखातील नोंदी तपासणीबाबत सर्व सदस्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुरंदर तहसीलमध्ये कुणबी जातीच्या नोंदीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
या कामासाठी तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पुरंदर तहसीलमध्ये तालुक्यातील सर्व कोतवाल, महसूल नायब तहसीलदार व अभिलेखपाल यांच्यामार्फत पुरंदर तालुक्यातील 103 गावांचे 7/12 चे जुने अभिलेख तपासण्यात येत आहेत.
तसेच तहसीलचे अभिलेखात उपलब्ध असलेल्या नमुना 14 मधील जुन्या जन्म- मृत्यूच्या मोडी भाषेतील नोंदी मोडी जाणकारांचे सहकार्याने तपासणीची कार्यवाही सुरु आहे.