खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी
पळसदेव – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून पळसदेव गावची ओळख आहे. याच गावात श्री पळसनाथाचे अतिप्राचीन मंदिर आहे मात्र उजनी धरणाच्या निर्मितीनंतर येथील मंदिर पूर्ण पाण्यात गेले. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी नवीन पुनर्वसित गावच्या बाहेर नवीन मंदिर बांधून जुन्या पळसनाथ मंदिरातील शिवलिंगाची स्थापना नवीन मंदिरात केली. या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी 25 लाखांचा निधी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष छगन बनसुडे, निलेश रंधवे, सुहास माने सह पळसदेव येथील नागरिकांनी पळसदेव गावाचे आराध्य दैवत श्री पळसनाथ मंदिरात शुशोभीकरण करण्यासाठी 25 लाखांचा निधी द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.
पळसदेव गावाला राजकीय मोठा वारसा आहे. अनेक निवडणुकात पळसदेव गावाचा कौल महत्वाचा मानला जातो. त्यामुळे पळसदेव गावावर कायम आपली सत्ता असावी यासाठी मामा आणि भाऊ कायम प्रयत्नशील असतात. मग ते विकास निधी देऊन असो की नागरिकांच्या वैयक्तिक कामातून असो.
त्यात गावचे आराध्य दैवत पळसनाथाच्या मंदिर सुशोभिकरण कामासाठी निधीची मागणी केल्यामुळे आता याबाबत सुळे यांनी सकारात्मकता दाखवून मंदिर सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, अशी मागणी पळसदेव येथील नागरिक करत आहेत.