प्रमोद ठोंबरे
बारामती -बारामती शहर आणि तालुक्यात सावकारकीने उच्छांद मांडला असताना पोलीस यंत्रणा हतबल झाली होती. मात्र, शहरातील व्यापारी प्रीतम शहा यांच्या आत्महत्येनंतर सावकारांचा जाचहाट चव्हाट्यावर आला आहे. धनिकपुत्रांची मक्तेदारी आणि पोलीस भयाविना मुक्त संचार सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरले जात होते.
जमिनी, घरे, स्थावर मालमत्ता बळकाविण्यासाठी धनदांडग्यांनी जणू चंगच बांधला आहे. दहशतीच्या बळावर बारामती शहर आणि परिसर दबून गेला होता. बोकाळलेली सावकारकीला चाप लावल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधानाची लकेर उमटली आहे.
बारामती शहर, तसेच बागायती टापूत सावकारकी बोकाळली आहे. यातच गरीब आणि गरजू नागरिक कुटुंबाच्या खर्चासाठी अन्य कारणासाठी बॅंकेच्या दारात जाण्याऐवजी सावकाराच्या दारात जाणे पसंत करीत होते. कमी वेळेत आणि विना कटकट रक्कम मिळत असल्यामुळे सधन बारामती शहर आणि तालुक्यात स्वयंघोषित सावकारांचे पेवच फुटले आहे.
गरजू कुटुंबांना सावकारांचे दरवाजे नेहमीच खुले असल्याने हे सावकार सावज हेरून बसत आहेत. यात पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याची चैन आणि महागड्या गॉगलची झगमगाट ही वेशभूषा बारामती शहर आणि तालुक्यात लक्ष वेधून घेत आहे. नाडलेल्या कुटुंबाकडून पाच ते पंचवीस टक्क्यांपर्यंत व्याज आकारण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हेरलेले सावज अलगद त्यांच्या जाळ्यात सापडत आहेत.
सावकारीबाबत कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तक्रारीतील सत्यता पडताळून या सावकाराविरोधात कारवाई केली जाईल. जमीनदस्त प्रकरणातील खोट्या तक्रारी देखील सावकारकीच्या नावाखाली दिल्या जात आहेत.
समोरील व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे तक्रारीतील सत्यता पडताळून कारवाई केली जाणार आहे. अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी पोलीस तत्पर आहेत.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती.
बारामती शहरात सावकारांकडून अवैध वसुली होऊ दिली जाणार नाही. सावकारांकडून होणारी मुस्कटदाबी थांबवण्यासाठी सावकारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. नागरिकांनी याबाबत निर्भयपणे पुढे येऊन तक्रार दाखल करावी. जेणेकरून पोलिसांना सावकारांचा बंदोबस्त करता येईल.
– नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक, बारामती शहर.
व्हाइट कॉलर आणि झारीतील शुक्राचार्य
बारामती शहरातील शहा आत्महत्या प्रकरणात एका नगरसेवकास अटक केल्यानंतर या व्यवसायात व्हाइट कॉलरचे लोक सहभागी असल्याचे चव्हाट्यावर आले आहेत. राजकीय आश्रयाखाली वावरणाऱ्या नेत्यांची पाळेमुळे सावकारकीशी घट्ट जोडली गेली आहेत. त्यामुळे या सावकारांविरोधात कारवाई होत नसल्याची खमंग चर्चा सध्या बारामती शहरात सुरू झाली आहे.
व्हाइट कॉलरचे लोक गोरगरीबांना नाडत असल्याची चर्चा सुरू होती. त्याला या कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे. राजकीय मांडवाखालून जाणाऱ्या सावकारांवरील कारवाई ही हिमनगाचे टोक आहे. त्यानंतर अजून सावकारांविरोधात धाडसत्र अवलंबल्यास झारीतील शुक्राचार्य सापडतील, अशी चर्चा सध्या शहरासह तालुक्यात सुरू आहे.
व्यवसायाला पायबंद बसणार?
बारामती शहर परिसरात हा बिनबोभाट धंदा हातपाय पसरत आहे. शहराभोवती असलेल्या जळोची, रुई, तांदूळवाडी, एमआयडीसी परिसर, माळेगाव परिसराला व्यापून टाकले आहे. सोमेश्वरनगर, करंजे पूल, डोर्लेवाडी, घागरवाडी, सांगवी आदी गावांमध्ये हा व्यवसाय फोफावला आहे.
गेल्या वर्षभरात पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली होती. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले होते. सध्या उच्चभ्रू कुटुंबातील व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याने सावकारकीचा उच्छांद चव्हाट्यावर आला आहे.