जुन्नर -पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पर्यटन विकास संस्था जुन्नर आणि जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ जुन्नर यांच्या वतीने 19 ते 21 फेब्रुवारी 2019 रोजी जुन्नर तालुक्यातील द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे “द्राक्ष महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार आहे.
त्या निमित्ताने पर्यटकांना द्राक्षबाग भेट, बैलगाडी, घोडेस्वारी, ट्रॅक्टर राइड, आदिवासी नृत्य, वासुदेव, नंदीबैल, लोककला, हेरिटेज वॉक, कॅम्पफायर, पक्षीनिरीक्षण, प्राचीन लेणी भेट, गड किल्ले ट्रेक, पेंटिंग, कॅम्पिंग, बोटिंग, ग्रामीण खाद्य संस्कृती याचा अनुभव घेता येणार आहे.
जुन्नर तालुक्यात पाच हजार एकर द्राक्ष बागा असून या भागातली द्राक्षे मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केली जातात आणि म्हणूनच या मातीतील शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने द्राक्ष महोत्सवामध्ये द्राक्ष पीक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
द्राक्ष किंग हा मानाचा पुरस्कार व उत्तेजनार्थ चार सन्मान केले जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्ष लागवड होते. ती आणखी वाढावी, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना चांगला भाव मिळावा यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
-सतीश शिरसाट, तालुका कृषी अधिकारी जुन्नर