संचालक निवडीसाठी कार्यक्रम जाहीर ः 29 मे रोजी मतदान
सहा गटांमधून 17 जागांसाठी रंगणार लढत
कापूरहोळ – राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर, (निगडे, ता. भोर) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 हा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. 17 संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सहा गटांसाठी 17 जागांवर निवडणूक होणार आहे. या जाहीर निवडणूक कार्यक्रमांमुळे राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय आखाड्यात याचे पडसाद कसे पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उपविभाग भोर, राजवाडा चौक, भोर येथे यांच्या कार्यालयात 25 ते 29 एप्रिल काळात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मिळणार आहेत.
उमेदवारी अर्ज शुल्क 100 रुपये भरावे लागणार असून, खुल्या व इतर प्रवर्गातील उमेदवारांना 2 हजार रुपये, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना 500 रुपये इतकी निवडणूक अनामत जमा करावी लागेल. मिळालेल्या नामनिर्देशनपत्रांची यादी त्या त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 2 मे रोजी 11 वाजल्यापासून करण्यात येईल. जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील त्याची यादी 4 मे रोजी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे काम पाहणार आहेत.
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र 5 ते 18 मे या काळात मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचे वाटप 19 मे रोजी होणार असून मतदान रविवारी (दि. 29 मे) होऊन मतमोजणी आणि निकाल मंगळवारी (दि. 31 मे) घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती राजगड सहकारी साखर कारखाना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
अशी आहे 17 जागांची विभागणी
मतदार संघ क्र. एक भोर देवपाल गट क्र. एक दोन जागा, देवळी हातवे बुद्रुक गट क्र. 2 तीन जागा, सारोळा गुनंद खंडाळा गट क्र. 3 दोन जागा, कापूरहोळ वेळु हवेली गट क्र. 4 दोन जागा, रूळे वरसगाव पानशेत गट क्र. 5 दोन जागा, तसेच मतदार संघ क्र. दोनमध्ये वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था एक जागा, मतदार संघ क्र. 3 मध्ये अनुसूचित जाती-जमातीकरिता एक जागा, मतदार संघ क्र. 4 मध्ये महिला राखीव प्रतिनिधी दोन जागा, मतदार क्र. पाच इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक जागा, मतदार संघ क्र. सहा भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक जागा असे एकूण 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.