आधुनिक प्रणालीद्वारे नवीन योजना कार्यान्वित – बाबासाहेब खालकर
मंचर –भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप सुरू असून त्याचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी केले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना आणि सभासदांना विविध सुविधा दिल्या जातात. त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जवळे (ता. आंबेगाव) येथील गावात स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
सहकारमंत्री व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद व ऊस उत्पादकांकरिता नेहमीच भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असतो, अशी माहिती कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी दिली.
स्मार्ट कार्ड वाटप प्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब खालकर, अकुंश गायकवाड, दिलीप लायगुडे, पोलीस पाटील रवींद्र लोखंडे, हरीश्चंद्र शिंदे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
भविष्यात तोडणी, नोंदणी कार्डद्वारेच
भीमाशंकर कारखान्याच्या वतीने सभासदांना स्मार्ट कार्ड वाटप गावोगाव केले जात आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थितीही स्मार्ट कार्डद्वारे घेतली जाणार आहे. भविष्यात स्मार्ट कार्डद्वारेच उसाची नोंदणी घेवून ऊसतोड केली जाणार आहे. ऊस उत्पादकांना साखर वाटप करण्यासाठी त्याचा लाभ सभासदांना होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.