हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी अविनाश भोर मालामाल
नारायणगाव – हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अविनाश अनंत भोर हा शेतकरी नऊ एकर जमिनीत लागवड केलेल्या टोमॅटोच्या विक्रीतून कोट्यधीश झाले आहेत. टोमॅटोच्या पिकाचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठा आर्थिक फायदा झाल्याचे शेतकरी अविनाश भोर यांनी सांगितले. मार्च महिन्यात दहा एकर जमिनीपैकी नऊ एकर जमिनीत अथर्व जातीच्या टोमॅटोची लागवड केली होती.
टोमॅटोची लागवड करताना नुकसान टाळण्यासाठी नऊ एकर जमिनीपैकी सहा एकर जमिनीत 15 मार्च तर तीन एकर जमिनीत 26 मार्च 2023 रोजी टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. जेणेकरून तोडणीच्या वेळी मजुरांना त्रास होणार नाही आणि जून, जुलै महिन्यात पडणारा पाऊस व टोमॅटोला मिळणारा भाव याबद्दल शाश्वती नसल्याने दोन टप्प्यात टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. नऊ एकर टोमॅटोच्या लागवडीसाठी एकूण 20 लाख रुपये खर्च आला होता. मे 2023 पासून टोमॅटो विक्रीसाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात जाण्यास सुरुवात झाली.
अविनाश भोर यांच्या शेतातून 15 दिवस दररोज 1 हजार टोमॅटोचे क्रेट नारायणगाव उपबाजारात विक्रीसाठी जात होते. सुरुवातीला एका क्रेटला 100 रुपयांपासून भाव मिळाला होता. त्यानंतर टोमॅटोचा भाव टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 2 हजार रुपये क्रेटप्रमाणे भाव मिळाला. आजपर्यंत अविनाश भोर यांच्या 25 हजार क्रेट टोमॅटोची विक्री झाली असून पुढील 10 ते 15 दिवस टोमॅटोचे 2 हजार क्रेट विक्रीसाठी जातील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
70 मजुरांना रोजगार
टोमॅटोची लागवड केल्यापासून तोडणीपर्यंत दररोज 40 मजूर शेतामध्ये काम करत होते. त्यानंतर टोमॅटोची तोडणी सुरू झाल्यापासून 70 मजूर सातत्याने काम करीत आहेत. शेतीच्या माध्यमातून मजुरांना काम मिळाल्याचा अविनाश भोर यांना आनंद झाला आहे. टोमॅटोची लागवड दोन टप्प्यात केल्याने तोडणीसाठी मजुरांना घाई गडबड करावी लागली नाही.
झेंडूचे एक एकरात 5 लाखाचे उत्पन्न
दहा एकर जमिनीपैकी नऊ एकर टोमॅटोच्या लागवडीतून अविनाश भोर कोट्यधीश तर झालेच; परंतु एक एकर जमिनीत येलो एक्सप्रेस झेंडूची लागवड करून त्यापासून पाच लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. एक एकर झेंडूच्या लागवडीसाठी दीड लाखाचा खर्च आला होता.