चौघांच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – देवदत्त निकम
पारगाव शिंगवे/मंचर – निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांच्या मृत्यूस भीमाशंकर सहकारी कारखान्याचे प्रमुख जबाबदार आहे. त्यांनी शेततळ्याच्या कंपाउंड दुरुस्तीसाठी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नेताजी गंधारे यांना शनिवार (दि. 25) दिले आहे.
निरगुडसर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा, पॉली हाऊस, ऊस बेणे प्लॉट विकसित केला आहे. तेथील शेती पिकांना पाण्यासाठी मोठे शेततळे निर्माण केले आहे. शुक्रवारी (दि. 24) चार बालके कारखान्याच्या शेततळ्यावर आंघोळीसाठी गेले व त्यात तळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे शेततळे करत असताना संरक्षीत जाळी ही भक्कम असणे गरजेचे असताना तेथे साधी तारेची जाळी वापरलेली आहे. तसेच लोखंडी खांब व तार अनेक ठिकाणी मोडलेले व तुटलेले आहेत.
या तारांच्यामध्ये असलेल्या मोठ्या जागेतून ती मुले आतमध्ये गेली व त्यांनी दोर ज्या खांबाला बांधला तो तूटून ती मुले पाण्यात बुडाली असे तेथे गेल्यानंतर पहावयास मिळाले. शेततळ्याची देखभाल व दुरुस्ती करणे हे कारखान्याचे प्रमुख म्हणून पदाधिकार्यांपैकी कोणीही कित्येक दिवस तेथे फिरकले नाही व दुरुस्ती देखील केलेली नाही. अनेक कामगार तेथे कामावर असताना कोणीही याबाबत (शेततळ्याच्या) कंम्पांउंड दुरुस्तीसाठी कार्यवाही केलेली नाही.
जर शेततळयाचे कंम्पाउंडला चैनलिंक प्रकारची जाळी बसवली असती तर निष्पाप मुलांचा जीव वाचला असता. त्यामूळे निरगुडसर येथील 4 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे प्रमुख म्हणुन अध्यक्ष भगवान (बाळासाहेब) मल्हारराव बेंडे, उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक व्हावी, या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणाने व्हावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.
पारगाव पोलीस ठाण्यात ला देवदत्त निकम यांचे निवेदन प्राप्त झाले असून चौकशी सुरू आहे.
नेताजी गंधारे, सहायक निरीक्षक, पारगाव पोलीस ठाणे