पुणे जिल्हा: खेडमध्ये बिघाडीच!

पुणे – खेडच्या राजकारण वेगवेगळ रंग घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच राजगुरूनगर, चाकण नगरपरिषदांवर सध्या प्रशासक असून लवकरच निवडणुका जाहीर होतील असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी तरी महाविकास आघाडीत बिघाडीच बघायला मिळेल, असा अंदाज आता राजकीय वर्तुळात व्यक्‍त केला जात आहे.

खेड तालुका पंचायत समिती सभापतीपदावरून चांगलेच राजकारण तापले असून सभापती भगावान पोखरकर यांच्या विरोधात 14 पैकी 11 सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला. तो मंजूरही झाला; परंतु अविश्‍वासाला 26 जूनपर्यंत स्थगिती मिळाली आहे. तर पक्षाविरोधात कारवाई केल्याने शिवसेनेने विरोधात गेल्या सहाही सदस्यांवर अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.

हा प्रस्ताव मान्य झाला तर हे सहाही सदस्य कोणत्यातच निवडणुकीसाठी पात्र राहणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. म्हणूनच वरिष्ठ नेते सावध पाऊल उचलत आहेत. याचे पडसाद नगरपरिषद तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर पडतील असा अंदाजही राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

शिवसेनेतील या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस बारिक लक्ष ठेवून आहे. त्यातच हे फोडाफोडीचे राजकारण आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला असल्याचा घणाघात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. तर याची री ओढत खासदार संजय राऊतही राजगुरूनगरात येऊन कडाडून गेले.

त्यावेळी तर त्यांनी हा विषय थेट दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांपर्यंत नेला असून उपमुख्यमंत्र्यांनीही या विषयात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यातच राऊत यांनी स्वबळाची भाषा वापरली आहे. त्यामुळे आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये खेड तालुक्‍यात महाविकास आघाडीत थोडक्‍यात बिघाडी दिसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दोघांच्या भांडणाचा तिसरा लाभ घेणार का?
खेड तालुक्‍यात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामर्थ्य जवळपास एकसमान आहे. तर भाजपनेही आपली घडी जोरदार बसवली आहे. दोघांमध्ये आधीपण कुरघोडी होत्या आणि आताही सुरूच असून आता तर त्या टोकाला पोहोचल्या आहेत. याच संधीचा लाभ भाजप उठवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्व. आमदार गोरेंची कमतरता जाणवते

शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड तालुक्‍याच्या राजकारणावर लक्ष ठेऊन असले तरी ते उपनेते असल्याने त्यांना 24 तास खेडमध्ये लक्ष देता येत नाही. माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याने त्यांच्यानंतरच्या नेत्याची तालुक्‍यात उणीव भासते आहे का? तालुक्‍यात ऐनवेळी निर्णय घेण्यासाठी आढळारावांनाच लक्ष द्यावे लागते, त्यामुळे आमदार गोरेंची कमतरता नक्‍कीच जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तालुक्‍यात शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी एका दमदार नेत्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.