पळसदेव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची गोची झाल्याचे दिसत आहे.
जिल्हा नियोजन मंडळातून आलेल्या निधी बाबत कायमच इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये श्रेयवाद पाहायला मिळत होता. जिल्हा नियोजनमधून आलेला निधी हा भाजपाच्या माध्यमातून आलेला आहे, असा युक्तिवाद कायम पाटील यांच्याकडून करण्यात येत होता. शिवाय पाटील व भरणे यांच्यात जिल्हा नियोजनाच्या कामाच्या बाबतीत कायमच कलगी-तुरा पाहावयास मिळाला आहे.
सध्या अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद असल्यामुळे आता तालुक्यात आलेला जिल्हा नियोजन समितीचा निधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आलेला आहे असा युक्तिवाद करण्यास दत्तात्रय भरणे मोकळे होणार आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे साहजिकच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भरणे यांच्या कामाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या पालकमंत्री पदामुळे हर्षवर्धन पाटील यांची गोची होणार आहे. त्यांना निधी मिळण्यासाठी राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यावे लागले. अन्यथा तालुक्यात जिल्हा नियोजन मंडळातून कामे करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे.
पाटील जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून तालुक्यात काही प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न करत होते. त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे सहकार्य होते. आता एका पाटलांचे पद गेल्यामुळे दुसऱ्या पाटलांना निधीसाठी अडचणींचा सामना करावा लागणार. राज्यात सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले असले तरी इंदापूर तालुक्यात मात्र हर्षवर्धन पाटलांवर त्यांचा रोष कायम राहणार आहे. आता यामध्ये नेमकं काय होणार ही येणारी परिस्थितीच ठरवेल. भरणे यांचे विकासाची एक्सप्रेस आता जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आणखी सुसाट सुटणार हे मात्र नक्की.