शनिशिंगणापूर – शनिशिंगणापूरमध्ये पानसनाला प्रकल्प पूर्णत्वाकडे आला असून, भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी नव्याने बांधण्यात आलेला दर्शन मार्ग येत्या काही दिवसात खुला होणार आहे. दरम्यान, मुख्य दर्शन मार्गात बदल करून बुधवार, दि. 22 रोजी नव्याने दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मुख्य दर्शन मार्ग बंद करण्यात येत असल्याने भाविकांनी नव्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन देवस्थान प्रशासनाने केले आहे.
गेल्या तेरा वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित पानसतीर्थ प्रकल्प येथे काही दिवसांत सुरू होत आहे. सध्या मंदिरातील मुख्य प्रवेशद्वारातून भाविकांसाठी सुरू असलेला मार्ग बुधवारपासून बंद करण्यात येत आहे. महाद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम भेटीचे शिल्प उभारण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने महाद्वार समोरील सध्या सुरू असलेला मुख्य मार्ग बंद करण्यात येत आहे.
भाविकांना शनी चौथऱ्यापर्यंत जाण्यासाठी वाहन तळावरील मुख्य गेट क्रमांक एक मधून भुयारी मार्गाने मंदिराकडे जाण्याचा मार्ग खुला केला आहे. भाविकांनी नव्या मार्गाचा अवलंब करून दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासन केले आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला पानसतीर्थ प्रकल्पाचे शेवटचे काम हाती घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळील विविध कामे करण्यासाठी सध्या सुरू असलेला मार्ग बंद करण्यात येत आहे. नव्याने उभारलेल्या दर्शन मार्गाचा भाविकांनी अवलंब करावा, जेणेकरून भाविकांसाठी सोयीचे दर्शन घेता येणार आहे.
नितीन शेटे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी
उद्घाटनाविनाच दर्शन मार्ग खुला
शनिशिंगणापूर येथे पानसतीर्थ प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तब्बल तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हा मार्ग भाविकांसाठी येथे काही दिवसांत खुला होत आहे. तत्पूर्वी मुख्य गेट गेटवर वॉल कंपाऊंड तसेच महाद्वारसमोर पुतळा उभारण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात येत असल्याने नव्याने उभारलेल्या दर्शन मार्गाने भाविक शनि दर्शनासाठी लाभ घेणार आहेत. भव्यदिव्य दर्शन मार्गाचा हा प्रकल्प सुरू होत असताना उद्घाटनाविनाच या रांगेतून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था होत आहे. विविध कामे झाल्यानंतर लगेच येत्या काही दिवसांत दर्शनरांग पानसतीर्थ प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली.