पुणे – राज्यासह देशात दाट धुक्यांमुळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे. दिल्लीतील दाट धुक्याचा फटका सलग तिसऱ्या दिवशी पुणे ते दिल्ली विमान सेवेला बसला. शुक्रवारी पुणे ते दिल्ली दरम्यानची पाच उड्डाणे रद्द करण्यात आली. तर, इतर काही विमानांना एक तासांपर्यंत उशीर झाला. दरम्यान, दिवसभरात एकूण 8 उड्डाणे रद्द झाली आहेत.
पुण्यातून दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने धावतात. या मार्गावर वेगवेगळ्या कंपन्याच्या साधारण १५ पेक्षा जास्त विमानसेवा आहेत. मात्र, तीन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यातील काही विमानांना उशीर होत आहे. तर, काही विमाने रद्द होत आहेत. मागील तीन दिवसात 25 हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली. गुरूवारी (दि. 29) दिवसभरात 14 उड्डाणे रद्द झाली, तर आज दिवसभरात पुण्यातून जाणारी 3 तर दिल्लीहून येणारी पाच अशी एकूण आठ विमान उड्डाणे रद्द झाली. तर काही विमानांचे उड्डाण उशिराने झाले.
“तांत्रिक किंवा हवामान बदलामुळे विमान कंपन्यांकडून विमान रद्द झाले, तर संबंधित प्रवाशाला तिकिटाचे पूर्ण पैसे दिले जातात. त्यासाठी प्रवाशाने ज्या पद्धतीने पेमेंट केले, त्यानुसार काही दिवसांत रक्कम खात्यात जमा होते. तसेच विमान रद्द झाले आणि पर्यायी मार्गाने विमानसेवा उपलब्ध असेल, तर तशी व्यवस्था विमान कंपनीकडून केली जाते.-” मंदार झोरे, प्रमुख, एम. हाॅलिडे