उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुणे –महापालिका निवडणुकांसंदर्भात प्रा-रूप प्रभागरचनेवरील हरकती सूचना होऊन अंतिम चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आघाडीबाबत निर्णय घेतला जाणार नाही. स्थानिक पातळीवर कितीही चर्चा झाली, विचार मांडले गेले, तरी वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महापालिकेची प्रभाग रचनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, प्रभाग पद्धतीमध्ये कोणाला आक्षेप असतील तर हरकती-सूचना द्याव्यात. पुण्यात काहीही चर्चा होतात. भाजप राष्ट्रवादी यांना सोयीस्कर असे काही केलेले नाही. कोणत्याही पक्षाला आक्षेप असेल त्यांनी हरकती नोंदवाव्यात.
पुण्यामध्ये काही जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आणि प्रभागरचनेवरून नाराज असलेले काही जण राष्ट्रवादीला रामराम करणार, अशी चर्चा मी ही ऐकली आहे. त्यामुळे आता कोण येणार आणि कोण जाणार यावर मी देखील लक्ष ठेवून आहे, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवडच्या कार्यकारिणीत मला पूर्वीच बदल करायचे होते. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता नवी कार्यकारिणी देण्यात आली आहे, असेही पवार म्हणाले.
शेवटी मतदार हाच राजा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला आहे. याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की, काही जण उत्साहाच्या भरात फार काही बोलून जातात. मी स्वत: आमदारकीसाठी बारामतीतून अर्ज केला तरी जिंकण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे मी म्हणतो. मतदार हा राजा आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे जाणण्यासाठी आपण काही ज्योतिषी किंवा मनकवडे नाही. मात्र, मतदारांना मान देत आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करत राहायचे.