पुणे – आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ) उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याने औंधकडून येणारी वाहतूक स्पायसर महाविद्यालयाच्या समोरून खडकीकडून वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यासाठी, महापालिकेकडून शुक्रवारी दिवसभर खडकी स्टेशनच्या मागील बाजूची रस्त्याच्या कडेला असलेली सुमारे ४४ अतिक्रमणे काढण्यात आली होती.
त्यानंतर, महापालिकेकडून शनिवारी पहाटेपर्यंत अतिक्रमण काढलेल्या रस्त्याचे रूंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या रात्रभरात खडकी-औंध, असा चारपदरी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे १२ मीटर रूंदीचा हा रस्ता आता तब्बल २४ मीटर रूंद झाला असल्याने या भागातील वाहतूक कोंडी मोकळी होणार आहे.
४० वर्षे जुनी अतिक्रमणे
औंध परिसरातील साई चौक, जयकर पथ येथे काल अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डव पुणे मनपाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या मध्ये सुमारे ४० वर्षांपासून अधिक काळ अतिक्रमणात असलेले ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. या अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व महापालिकेस संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार काल संयुक्त कारवाई करण्यात आली.
सेवा वाहिन्या रात्रीत हटविल्या
विशेष म्हणजे महापालिकेकडून या रस्त्याचे रूंदीकरण करताना रस्त्यात येणार्या सेवा वाहिन्या एका रात्रीत स्थलांतरित केल्या आहेत. यात, महापालिकेच्या जलवाहिन्या, खासगी केबल तसेच महावितरणचे फिडर फिलर, पथ दिवे, झाडांचे पुनर्रोपन आणि त्यानंतर पुन्हा रस्ता तयार करणे, अशी कामे एका रात्रीत करण्यात आली आहेत.