पुणे – दुचाकीवरुन जाताना पावसाचे पाणी अंगावर उडाल्याने एका अल्पवयीन मुलावर कोयता व तलवारीने वार करण्यात आले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
खडी मशीन येथे रहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीनूसार आरोपी सुरज यादवराव रसाळ (19,रा.कडनगर चौक उंड्री), स्वप्नील उर्फ अनिकेत नितीन कणसे (19,रा.चॉंदतारा चौक,कोंढवा-बुद्रुक), ओमकार सचिन शेंडगे (19,रा होळकरवाडी ), नितीन एकनाथ पाटील (20,रा.कडनगर चौक,उंड्री ), किरण नामदेव जाधव (19,रा.मरळचाळ,कोंढवा-बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा 12 जून रोजी कोंढवा येथील मरळ चाल येथून दुचाकीवरुन चालला होता. त्याच्यासमवेत त्याचा मित्र रोहन गायकवाड होते. ते दोघे तालाब फॅक्टरी समोरून आईस्क्रीम खाऊन परत त्यांचे घरी दुचाकीवर जात होते.
यावेळी यातील आरोपी फिर्यादी यांचे पाठीमागुन येत असताना, रोडवरील पावसाचे पाणी फिर्यादी यांचे अंगावर उडाले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारल्याचा राग मनात धरून, आरोपी यांनी त्यांचेकडील केयता व तलवारीने फिर्यादीच्या पोटावर पाठीवर व डावे दंडावर उलटा वार करून गंभीर जखमी करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर फिर्यादी हे घरी गेले असता, आरोपी यांनी त्यांचे चाळी मध्ये येऊन समोर पार्क केलेल्या वाहनांची काच फोडुन आरडा-ओरड करून, शिवीगाळ केली. तसेच सदर परिसरात दशहत पसरवुन नुकसान केले.