पुणे – ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकावणाऱ्या चोरटयांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चार हजार रोख, मोबाईल व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. पियुष गणेश भरम (19,रा.आंबेगाव पठार) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 24 फेब्रुवारी रोजी एक ज्येष्ठ महिला राजस सोसायटीजवळील बस थांब्यापासून पायी चालली होती. यावेळी मोपेडवरुन आलेल्या आरोपीने तीची पर्स हिवकावली. या गुन्हयाचा तपास सुरु असताना, पियुष फोन विक्री करण्यासाठी कात्रज ओव्हरब्रीजखाली येणार असल्याची खबर अभिजीत सावंत व विक्रम जाधव यांना मिळाली होती. त्यानूसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले.
त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली ऍक्टीव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याने यापुर्वी एका साथीदाराच्या मदतीने मेडिकल शॉपच्या गल्लयातील 22 हजाराची रोकड चोरुन नेली होती. या गुन्हयात तो फरार होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, राहुल तांबे, गणेश शेंडे आदींच्या पथकाने केली.