पुणे – हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेतकर्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवनने आजवर लपवून ठेवलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठाही राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केला.
समृध्द जीवनने आत्तापर्यंत लपवून ठेवलेल्या महत्वाच्या कागदपत्रांचा पहिला साठा आठवड्यापुर्वी नर्हे येथील एका सोसायटीत सापडला होता. त्यानंतर धायरी येथेही बुधवारी एका सदनिकेत मोठा कागदपत्रांचा साठा सीआयडी’च्या पथकाने बुधवारी जप्त केला.
शेतीला पुरक व्यावसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्धा २२ राज्यात २८ गुन्हे दाखल आहेत.
राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपूर्वी सीआयडी कडे देण्यात आला. या गुन्ह्यात एकूण २५ बड्या व्यक्तींचा सहभाग असून त्यापैकी १७ जणांना सीआयडीने यापुर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. तर ८ जण या प्रकरणा मध्ये फरारी आहेत. महेश मोतेवार सध्या ओरीसा राज्यातील कारागृहामध्ये आहे.
सीआयडी’च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिस उपअधिक्षक मनीषा धामणे पाटील यांचे पथकाने कागदपत्रांचा सलग दुसरा साठा जप्त केला.
समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील लपवून ठेवलेली महत्वाची कागदपत्रे पुन्हा दुसरीकडे हलवली जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाकडून टेम्पोंवर लक्ष ठेवण्यात आले होते.
या पथकास टेम्पोचा क्रमांक मिळाल्यानंतर त्याचा माग काढल्यानंतर नऱ्हे येथील कागदपत्रांचा साठा जप्त करण्यात यश आले होते. त्या पाठोपाठ धामणे यांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार धायरी येथील एका सदनिकेतही ठेवलेला महत्वाच्या कागदपत्रांचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला.
त्या कागदपत्रांचा पंचनामा सुरू आहे. मनीषा धामणे – पाटील, पोलिस निरीक्षक सीताराम फंड, विठ्ठल पवार, सपोनि अरुण मोरे, विकास कोळी, सचिन उबाळे, महेंद्र तुपे, आशा जाधव, कविता नाईक, दिपाश्री साळुंके, भाग्यश्री मोहिते, ज्योती धनुरकर, दिपाली चव्हाण, माधुरी मोरे, सारीका कुंभार आदींनी ही कारवाई केली.