पुणे – आरोग्य विभाग कर्मचारी भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दोन दलालांना मंगळवारी अटक केली. आरोग्य विभागातील परीक्षा प्रश्न पत्रिका फूट प्रकरणात अटकेत असलेले मुंबईतील आरोग्य विभाग कार्यालयाचे संचालक डाॅ. महेश बोटले यांच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली असून परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा’तील संचालकांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
याप्रकरणी निशीद रामहरी गायकवाड (वय ४३, रा. शेवाळकर गार्डन, अंबाझरी रस्ता, नागपूर मूळ रा. एशियाड काॅलनी, शेगाव रहाटगाव रस्ता, अमरावती) आणि राहुल घनराज लिघोंट (वय ३५, रा. देवी पार्क, शेगाव रहाटगाव रस्ता, अमरावती) यांना अटक करण्यात आली. आरोग्य विभाग प्रश्न पत्रिका फूट प्रकरणात डाॅ. बाेटले, आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप जोगदंड यांच्यासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच दलाल, परीक्षार्थी प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात सामील असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभगाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते चार यावेळेत पार पडली. प्रश्नपत्रिकेतील १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न परीक्षेपूर्वीच समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात आरोपींकडून लॅपटाॅप तसेच मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले आदी यावेळी उपस्थित होते.