पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे या 14 वर्षीय दुर्देवी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तब्बल 13 असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बलात्कार झाल्याचे माहिती असून तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली. दरम्यान या सर्व आरोपींना 16 सप्टेंबर पर्यंत कॅटडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले.
पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेतील आठ आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. आज केलेली कारवाई धरून एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या 14 झाली आहे.
मिराअली उर्फ मिरा अजीज शेख( 26, धंदा- सुतार, रा. मंगळवार पेठ ), शाहजुर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद(28, धंदा- वॉचमन, कोंढवा), समीर मेहबुब शेख(19, धंदा-फॅब्रिकेशन, रा.कोंढवा खुर्द), फिरोज उर्फ शाहरुख साहेबलाल शेख(, 22,धंदा-प्लंबर, कोंढवा), महबुब उर्फ गौर सत्तार शेख(23, धंदा-गवंडी, रा.कोंढवा खुर्द) आणि पिडीतेचा मित्र मोहम्मंद उर्फ गोलु मोज्जाम आलम(19,धंदा.मजुरी,रा.वैशाली, बिहार) अशी या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींना विशेष न्यायाधीश एस.पी. पोंक्षे यांनी 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष सरकारी वकिल शुभांगी देशमुख यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
मित्राला भेटण्यासाठी बिहारला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या 14 वर्षीय मुलीला प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत तीच्यावर सलग दोन दिवस शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली होती. पोलिसांनी मिसिंग प्रकरणाच्या तपासातून ही घटना उघडकीस आणत त्परतेने आठ जणांना अटक केली होती. मंगळवारी नव्याने सहा जणांना अटक करण्यात आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
“पिडीता अत्याचार झाल्यानंतर मुंबईला गेली होती. तेथे तीचा मित्र मोहम्मंद आलम हा तीला नेण्यासाठी आला होता. पिडीता अल्पवयीन असल्याचे तसेच तीच्यावर अत्याचार झाल्याचे त्याला माहिती होते. यामुळे त्याने पिडीतेचा ताबा तीच्या पालकांना देणे आवश्यक होते. मात्र त्याने तसे न करता तीला चंदीगडला नेले. यामुळे त्याला अटक करण्यात आली.”
– दीपक लगड, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)