पुणे – इलेक्ट्रीक वस्तू खरेदी केल्यातर तुम्हाला 90 टक्के कॅशबॅक देऊ असे प्रलोभन दाखवत एका व्यक्तीला 14 लाख 4 हजार 631 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये 6 लाख 30 हजारांची मुद्दल व 7 लाख 74 हजार 631 रुपये कॅशबॅकने होणारी रक्कम असा दोन्हीचा समावेश आहे.
याप्रकरणी, सोपान भाऊसाहेब येवले (वय.35,रा.केसनंदर रोड वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुर्गा परमनंद उर्फ ममता ओम सावरिया व ओम सावरिया (रा. नगर पुणे रोड वाघोली) या दाम्पत्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 31 डिसेंबर 2019 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे. दरम्यान आरोपींनी फिर्यादींना वस्तू खरेदी केल्यानंतर कॅशबॅकची रक्कम पुढील चार महिन्यांच्या तारखा टाकून धनादेश दिले होते. मात्र काही दिवसानंतरच दोघांनी दुकानाचा गाशा गुंडाळून पळ काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.