पुणे – पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या व्यावसायिकावर लष्कर भागात सोमवारी हल्ला करण्यात आला.
सलीम करमानी शेवानी ( रा. शास्त्रीनगर, येरवडा ) असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. शेवानी यांचे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या कोळसे गल्ली पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. चार दिवसांपूर्वी येरवड्यातील टर्फ क्लब परिसरात शेवानी यांना अडवून सल्लाउद्दीन शेख आणि साथीदारांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. शेवानी यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दिला होता.
सोमवारी (१ नोव्हेंबर) दुपारी शेवानी दुकानातून कामानिमित्त घरी निघाले होते. व्हिक्टरी चित्रपटगृहाजवळ दोघांनी शेवानी यांना अडवले आणि त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. याप्रकरणी रात्री उशीरा लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.