पुणे – जन्मठेपेची शिक्षा झालेला व 11 वर्षापासून पॅरोलवरून फरार असलेल्या गुन्हेगारास त्याचे दोन साथीदारांसह गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्टल व चार राऊंडसह हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना खबर मिळाली की, पॅरोल रजेवरली आरोपी खुशाल
भुंडे (रा. बावधन, जि. पुणे) हा गेल्या 11 वर्षापासून फरार असून तो चांदणी चौकतील वेधभवन जवळ मित्राची वाट बघत थांबलेला आहे.
1 लाख 20 हजारचा ऐवज जप्त –
त्यानूसार पथकाने सापळा रचून वारजेकडे जाणा-या सर्व्हिस रोडवरील वेधभवन पासून 200 मीटर अंतरावर खुशाल चिंधु भुंडे (53) अमित बाळासाहेब दगडे (37 ) आणि मनिष सहदेव मोरे (35 तिघेही रा. शिवसेना ऑफिसजवळ, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे) या तिघांना अटक केली. त्यांचेकडे दोन पिस्तूल, चार जिवंत राऊंड, एक रॅम्बो चाकु, तीन मोबाईल हॅन्डसेट व एक मोटर सायकल असा एकुण 1 लाख 20 हजारचा ऐवज मिळून आला आहे.
जन्मठेपेची शिक्षा –
आरोपी खुशाल चिंधु भुंडे याचेकडे केलेल्या तपासात त्याचेविरूध्द हिंजवडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हयामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. शिक्षा भोगत असताना त्याने सन 2012 मध्ये पॅरोल रजेकरीता अर्ज केला होता. त्यास रजा मंजूर झाल्यावर रजा भोगून तो मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याऐवजी तो बगाहा (बिहार) राज्यात पळून गेला.
याप्रकरणी माढा पोलीस ठाणे ( सोलापुर) येथे नोंद आहे. या कालावधीत त्याने बिहार, मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वास्तव्य केले होते. तो मागिल दिड महिन्यांपासून बावधन, पिरंगुट परीसरात लपून रहात होता खुशाल चिंधु भुंडे याने उत्तरप्रदेशवरून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत राऊंड घेवून आला होता.
आर्म ऍक्टचा गुन्हा –
त्याच्यावर आता वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्टचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपी अमित बाळासाहेब दगडे व मनिष सहदेव मोरे यांचेविरूध्द यापुर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह-आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उप-निरीक्षक, अजितकुमार पाटील, राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कटटे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.