कात्रज – एआयवर आधारित असलेल्या शेतीसाठीची देशातील पहिली लॅब बारामतीत होत आहे. मायक्रोसाॅफ्टच्या माध्यमातून त्याठिकाणी शेतीच्या सुयोग्य नियोजणासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे चव्हाण सेंटरतर्फे एआयच्या बाबतीत यापुढे काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्याचबरोबर एक थिंक टँक देखील तयार केला जाणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आपल्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. पण, ती परंपरा पुढच्या पिढीस सांगण्यात आपण कमी पडत आहोत. आज, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे एआयमुळे अनेक समीकरणे बदलत आहेत.
यावेळी रंगमंचीय कलाविष्कार, क्रीडा, साहित्य, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता आणि नवनिर्मिती या विषयांत उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण आठ युवक आणि सात युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार देण्यात आले. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे राजू जगताप, चव्हाण सेंटरचे विश्वस्त अजित निंबाळकर, जिल्हा केंद्र पुणेचे सचिव अंकुश काकडे, आनंद अवधानी, डॉ. गणेश चंदनशिवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले.
पुरस्काराने सन्मानित…
युवा क्रीडा पुरस्कार – स्वप्नील कुसळे, अदिती स्वामी, सामाजिक युवा पुरस्कार- राजू केंद्रे, राही मुजुमदार,
रंगमंचीय कलाविष्कार – जगदीश कन्नम, मयूर शितोळे, पर्ण पेठे, युवा साहित्यिक पुरस्कार – पूजा भडांगे, अमोल देशमुख, युवा उद्योजकता पुरस्कार – संदेश भोसले, मीनल वर्तक, पत्रकारिता युवा पुरस्कार – कुलदीप माने, दिपाली जगताप, इनोव्हेशन युवा पुरस्कार – डॉ. प्रशांत खरात, साक्षी धनसांडे.