पुणे- “फार्मासिस्ट हा समाजासाठी पर्यायी डॉक्टर असतो. लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी फार्मास्युटिकल आणि फार्मासिस्ट समुदायाने प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यात फार्मासिस्ट मोलाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन जेनरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी केले.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चचे (एससीपीएचआर) व ‘सूर्यदत्त ग्लोबल फार्माकॉन २०२३’चे उदघाटन अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोकाटे होते. याप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, फार्मा उद्योजक बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील, सहायक पोलीस आयुक्त महेशकुमार सरतापे, अभिनेता शरद सांकला, प्रा. हेमंत जैन उपस्थित होते.
यावेळी अर्जुन देशपांडे यांना फार्मसी क्षेत्रातील कार्याबद्दल ‘सूर्यदत्त धन्वंतरी ग्लोबल आयकॉन अवॉर्ड’, तर डॉ. चंद्रकांत कोकाटे, शरद सांकला, महेशकुमार सरतापे, बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील यांना ‘सूर्यदत्त सूर्यभारत सूर्यगौरव ग्लोबल सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्जुन देशपांडे म्हणाले, फार्मा क्षेत्रात उद्योगांच्या मोठ्या संधी आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हायला हवीत, यासाठी जेनेरिक आधारची सुरुवात केली. आज देशभरातील कोट्यवधी लोकांना ही सेवा पुरवत असून, आठ हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार दिला आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा.
डॉ. कोकाटे म्हणाले, “फार्मा उद्योगाच्या आयात-निर्यातमध्ये भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काळात फार्मसी व्यावसायिकांचा गरजा पूर्ण करण्याचा सूर्यदत्त प्रयत्न करेल. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “अर्जुन देशपांडे यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या १६ व्या वर्षी जेनेरिक आधार हा फार्मा उद्योग सुरु करून स्वस्तात औषधे देतानाच मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही देखील या कॉलेजमध्ये संशोधन, इंनोव्हेशन आणि उद्योग निर्मितीला प्राधान्य देणार आहोत. त्यासाठी इन्क्युबेशन सेंटर सुरू करणार असून, विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत.