पुणे -महापालिका अधिकाऱ्यांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार बढतीसाठी महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी राज्यशासनाकडे पाठविण्यात महापालिका आयुक्तांकडून दिरंगाई झाल्याने अखेर शासनाने या पदावर भारतीय रेल्वे सेवेतून राज्यशासनाकडे प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी विकास ढाकणे यांची नेमणूक केली आहे. अतिरिक्त आयुक्त विलास कानडे सेवा निवृत्त झाल्यानंतर महापालिकेचे पाच ते सहा अधिकारी या पदासाठी इच्छुक होते. मात्र, अधिकाऱ्यांमध्येच वाद सुरू असल्याने अखेर शासनाने पालिकेला धक्का देत प्रतिनियुक्तीचे अधिकारी नेमल्याने अनेक अधिकाऱ्यांची या पदावरील संधी हुकणार आहे.
राज्यशासनाने या पदास 2015 मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर या पदाच्या नियुक्तीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या वादामुळे हे पद रिक्तच होते. शासनाने 2018 मध्ये पहिले अतिरिक्त आयुक्तपदी सुरेश जगताप यांची नियुक्ती केली. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. तर महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पद नियुक्त केले जाणार होते. यासाठी महापालिकेकडून 5 ते 6 अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवायची होती. सामान्य प्रशासन विभागाकडून हा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला होता. मात्र आयुक्त कार्यालयातून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शासनाने महापालिकेच्या प्रस्तावाची वाट न बघताच थेट ढाकणे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. दरम्यान, या सेवाज्येष्ठता यादीत असलेले अनेक अधिकारी पुढील दोन वर्षांत सेवानिवृत्त होणार असल्याने या अधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त होण्याची संधी हुकणार आहे.
अतिरिक्त आयुक्तांच्या स्पर्धेत हे ही होते…
सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीए कडे प्रतिनियुक्तीवर गेलेले विवेक खरवडकर तसेच विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची नावे अंतिम केली होती. यावर महापालिका आयुक्तच निर्णय घेणार होते. नगर अभियंता या पदासाठी पहिल्यापासूनच इच्छुक नाहीत. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उल्का कळसकर या पात्र ठरत होत्या. एक महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाली तर पुण्यासाठी ते महत्वाचे मानले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.