पुणे – दहा महिन्यांपासून बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी तब्बल 25 लाखांचे साहित्य क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने खरेदी केले आहे. मात्र, प्रत्यक्षात एका वर्षासाठी एवढा खर्च येतो का? हा प्रश्न आहे. या खरेदीबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थाकडूनही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याची दखल अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली आहे.
या प्रकरणी आयुक्त कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्व माहिती मागवली असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. तर, या प्रकारामुळे “ही बंगल्यांची नाही, तर महापालिकेची तिजोरी “साफ’ करण्याचा प्रकार आहे,’ अशी टीका होत आहे.
घोले रस्ता- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे महापौर बंगला तसेच पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेचे काम पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नियमित स्वच्छता होते. यावर्षीही क्षेत्रीय कार्यालयाने या दोन्ही बंगल्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे स्वच्छतेसाठी साहित्याची मागणी केली. त्यानुसार भांडार विभागाने ही स्वच्छता साहित्याची खरेदी केली असून, ती जवळपास 25 लाखांची आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेचा महापौर बंगला 15 मार्च 2022 पासून बंद आहे. महापालिका सदस्यांची मुदत संपल्याने हा बंगला प्रशासनाने ताब्यात घेतला असून, तेथे कोणीही राहत नाही. तरीही त्याच्या स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करण्यात आली.