पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्व रस्ते जलमय झाले होते. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. परंतु, अशाही स्थितीत गणेशोत्सवाची गर्दी कमी झाली नव्हती. दरम्यान, शहरात रात्री उशीरापर्यंत 35 मिमि पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
मागील दीड महिन्यांपासून खंड पडल्यानंतर पावसानंतर मागील दोन दिवसांपासून पावसाची चांगली सुरुवात केली. लाडक्या गणरायाचे आगमन आणि वरुणराजाची हजेरी यामुळे पुणेकर सुखावले आहे. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असल्याने आज पाऊस हुलकावणी देणार असे वाटत होते. मात्र, दुपारी 04:00 नंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरवात झाली.
शहरासह कात्रज, धनकवडी, धायरी, वारजे, एनडीए, कोथरूड, पाषाण, औंध, येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोंढवा यासह शहराच्या मध्यवर्ती भागाला पावसाने चांगलेच झोडपले. सर्व रस्ते जलमय झाले. अचानक एवढा मोठा पाऊस झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली.
शहराच्या विविध भागात झालेला पाऊस (मिमीमध्ये)
एनडीए 35, वडगावशेरी 12, शिवाजीनगर 11, कोरेगावपार्क 4, हडपसर 8
पाऊस थांबताच वाहतूक कोंडी…
पाऊस आला तरी हलकी सर येईल आणि जाईल, यामुळे पुणेकर विना छत्री, रेनकोट घराबाहेर पडले. मात्र, दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे सर्वांची धांदल उडाली. पादचाऱ्यांसह वाहनचालकांनी आडोसा घेतला तर पाऊस थांबल्यानंतर शहरातील टिळक रोड, कर्वे रोड, लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, भिडे पूल, डेक्कन, संचेती चौक, आरटीओ कार्यालय परिसर यासह अन्य प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.