पुणे – महापालिकेतर्फे विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात येणार असून, ऑफलाइन अपॉइंटमेंट सिस्टिम बंद करण्यात येणार आहे. थोड्याच दिवसांत या संदर्भातील नोटिफिकेशन काढण्यात येईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयात विवाह नोंदणी केली जाते. त्यासाठी ऑफलाइन अपॉइंटमेंट घेतली जात होती. मात्र आता ही सिस्टिम बंद करण्यात येणार असून, केवळ ऑनलाइनच अपॉइंटमेंट घेतली जाणार आहे. या प्रमाणे कॉम्प्युटर सिस्टिममध्ये बदल केले जाणार आहेत.
ज्यांना ऑनलाइन विवाहनोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा या वेळेत ऑनलाइन विवाह नोंदणी सिस्टिम सुरू राहणार आहे. तेवढ्याच कालावधीत विवाह नोंदणी होऊ शकणार आहे, यामुळे नव्याने अशी नोंदणी करणाऱ्यांना नव्या नियमांना सामोरे जावे लागेल.
असे आहेत नवे नियम
- महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998 मधील तरतुदीनुसार विवाहाची नोंदणी करण्यासाठी वर किंवा वधू पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- विवाह ज्ञापन (नमुना ड) विवाहाचे तारखेपासून 90 दिवसांच्या आत निबंधकांकडे समक्ष वधू वराने स्वतः उपस्थित राहून सादर करणे आवश्यक तसेच ज्ञापनावरील तीनही साक्षीदार यांनी निबंधक यांचे समक्ष उपस्थित सह्या करणे आवश्यक आहे.
- उशिरा सादर केलेले ज्ञापन शास्ती (दंड) आकारून नोंदणीस स्वीकारता येतात.
- सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय विवाह ज्ञापन स्वीकारले जाणार नाही.
- विवाह ज्ञापन ऑनलाइन पद्धतीने सुद्धा rts.punecorporation.org किंवा services.punecorporetion.org सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून सादर करता येते. ऑनलाईन बाबत अपॉईटमेंट दिनाकांच्या एक दिवस अगोदर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक.
- कलम 20 नुसार हा अधिनियम विशेष विवाह अधिनियम (1954) , भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम (1872), किंवा पारशी विवाह आणि घटस्फोट अधिनियम (1936), याखाली लागलेल्या विवाहांना लागू होणार नाही.
- विवाह मंडळांची नोंदणी विवाह निबंधकाकडे करणे अनिवार्य आणि कायद्याने बंधनकारक आहे. नमुना “अ’ मध्ये अर्ज नोंदणी शुल्क, दोन हजार रुपये /- आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी.