पुणे, दि. 24 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात (राज्य मंडळ) नव्याने भरती झालेल्या तीन लिपिकांची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेची प्रमाणपत्रे बोगस आढळली आहेत. राज्य मंडळात नियुक्त झाल्यानंतर मंडळाकडून या नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या टायपिंग प्रमाणपत्रांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तपासणी करून घेण्यात आली. या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, “टीईटी’ पाठोपाठ अशा प्रकारे आता टायपिंग परीक्षेचीही बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे समोर आल्याने चौकशीत आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासकीय विभागांच्या लेखनिक संवर्गातील नोकरीसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक असून, परीक्षा परिषदेकडून त्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. मात्र आता “टीईटी’ पाठोपाठ ही टायपिंगची प्रमाणपत्रेही बोगस आढळल्याने परीक्षा परिषद पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
शासकीय नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेण्यात येतात. कर्मचारी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येतात. परिषदेकडून संबंधित प्रमाणपत्रावरील सीट नंबर, नाव व अन्य माहिती रजिस्टरमधील माहितीशी जुळते की नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वैध की अवैध यावर शिक्कामोर्तब केला जातो.
राज्य मंडळाकडे 262 कर्मचाऱ्यांची नुकतीच भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या टायपिंगच्या परीक्षांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यातील तीन कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रावरील माहिती परीक्षा परिषदेतील रजिस्टरमधील माहितीशी विसंगत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बोगस असल्याने ती जप्त करण्यात आली असून, संबंधित तीनही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
-शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ