पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे आणि संपूर्ण कार्यकरिणीने विविध राजकीय पक्षांचे प्रमुखांची भेट घेऊन निवेदन देण्यास सुरूवात केली आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणुन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष थोरवे यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे यांनी राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी पवार यांना निवेदन देण्यात आले.
पवार यांनी सुमारे 15 मिनिटे व्यवस्थित पुण्याची बाजू ऐकून घेऊन घेतली. त्यानंतर विषयाची आधिक माहिती घेण्यासाठी मुंबई भेटीचे निमंत्रण दिले. त्यावेळी पवार हे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून, मागणीचे पत्रही ठाकरे यांना देणार आहेत. याबरोबरच यावेळी पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना वकील संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
“पुणे बार असोसिएशनकडून खंडपीठाचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे वकील बांधवासह हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
– ॲड. पांडुरंग थोरवे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.
पुणे, औरंगाबाद येथे खंडपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात 1978 मध्ये मंजूर झाला. 1981 साली औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, पुण्यात अद्याप खंडपीठ सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.