पुणे : बेवारस मुलासाठी पोलीस ठरले देवदूत

मुलाला दाखल केले बालसंगोपन संस्थेत ः व्यसनी वडिलांनी सोडून दिले रस्त्यावर
पुणे –
व्यसनी वडिलांनी एका दहा वर्षाच्या मुलास रस्त्यावर बेवारस अवस्थेत सोडून दिले. मात्र, पोलीस देवदूतासारखे धावून आले आणि त्यांनी मुलाला बाल संगोपन संस्थेत दाखल केले. ही कामगिरी वारजे पोलिसांनी केली. संबंधित मुलाची आई व्यसनी पतीला सोडून गेल्याने तो एकटाच वडिलांबरोबर राहात होता.

पोलीस उपनिरीक्षक येवले गुरुवारी रात्रपाळीवर होते. ड्युटी चार्ज घेतल्यानंतर गाडी काढून आपल्या सहकाऱ्यांसह वारजे परिसरात गस्तीवर रवाना झाले. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास दहा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत दिसला. “त्याला काय झालं’ हे विचारले असता तो जास्त घाबरला.

पोलिसांना पाहून रडत होता. विश्‍वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता. त्याने “माझे नाव अमोल रामदास शिंदे असून वय 10 वर्षे आहे. मी भूगाव येथे शाळेत शिकत होतो. वडील हे खूप दारू पितात म्हणून आईपण त्रासाला कंटाळून निघून गेली. त्यांनीच मला इथे आणून सोडले व गुपचूप येथून निघून गेले’ असे सांगितले. यानंतर पोलिसांनी मुलाला पोलीस ठाण्यात आणून खाण्यासाठी दिले. तसेच आपण तुझ्या वडिलांना शोधून काढण्याचा विश्‍वासदेखील दिला.

रात्रीच्यावेळी पोलीस कर्मचारी फिरोज शेख, रमेश चव्हाण, शेख यांच्यास पोलीस उपनिरीक्षक येवले मुलाला घेऊन त्याच्या घरचा पत्ता शोधण्यासाठी भूगावकडे मार्गस्थ झाले. सुमारे 30 किलोमीटरचा प्रवास करत पोलिसांनी मुलाचे घर गाठले. पोलिसांनी शेजारच्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांनी त्याचे वडली घर सोडून केव्हाच निघून गेल्याचे सांगितले. शेवटी वारजे पोलिसांनी पोलीस ठाण्यातच मुलाचा रात्रभर सांभाळ करून दुसऱ्या दिवशी त्याला जीवनाश्‍यक वस्तूंची खरेदी करून देत बालसंगोपन संस्थेत दाखल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.