पुणे-अनेकांना करोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडला आहे. त्यातच करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुन्हा विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात एक हजाराहून अधिक विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून पावणेसहा लाखांचा दंड वसूल केला. तर आतापर्यंत तब्बल 45 कोटी 72 लाखांचा दंड वसूल केला आहे.
बाजारपेठांसह सर्वत्र वर्दळ वाढली आहे. मात्र, यामध्ये नागरिक मास्क लावणे, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम विसरले आहे. तर, काही बेजबाबदार नागरिक विनामास्क बाहेर फिरताना आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसत आहे.
करोनाचा भविष्यातील धोका लक्षात घेता पोलीस, पुणे महापालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून पुन्हा कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दहा लाख विनामास्क व्यक्तींवर कारवाई करून तब्बल 45 कोटी 73 लाख 21 हजार 563 रुपये दंड वसूल केला. त्यामध्ये सर्वाधिक पुणे शहरात 27 कोटी 89 लाख 97 हजार 620 रूपयांचा दंड वसूल केला. पिंपरी-चिंचवडमधून 6 कोटी 30 लाख 46 हजार 998 रुपये दंड वसूल केला आहे. तर ग्रामीणमध्ये 11 कोटी 52 लाख 60 हजार 935 रूपयांचा दंड वसूल केला आहे.